पूर्वींच्या काळांत खेडेगांवातल्या न्हाव्यांना सर्व तरुण मुलांची इथ्यंभूत माहिती असे. साहजिकच ठाकुराने गांवातल्या न्हाव्याला बोलावून घेतले आणि चमेलीसाठी एखादे अनुरूप स्थळ सुचवण्यास सांगितले. दोघेही या चर्चेत गुंगून गेले होते. न्हावी एकेका मुलाचे नांव व माहिती सांगत होता आणि त्यांचे गुण-अवगुण ह्याची चर्चा करीत होता. ठाकुराचा आग्रह होता कीं मुलगा मध्यमवर्गातल्या घरांतला असावा, पण कुलशीलवान व सुसंस्कृत असला पाहिजे. चमेली स्वयंपाकघरांत त्यांच्यासाठी पोळ्या करीत होती. तिने हे संभाषण ऐकले. ती बाहेर येऊन म्हणाली, ‘‘बाबा, मी गांवातल्या सर्वश्रेष्ठ पुरुषाशीच लग्न करीन, कुणा सामान्य माणसाशी नाही करणार!’’ रामस्वरूप आणि न्हावी, दोघेही थक्क झाले. ही मुलगी आपल्या लग्नाबद्दल इतके स्पष्टपणे, आणि धिटाईने बोलेल असं त्यांना वाटले नव्हते. तोपर्यंत ठाकूर कधी मुलीला रागावला नव्हता, पण त्यादिवशी मात्र तो चिडला. ‘‘चमेली, तरुण मुलींनी आपल्या लग्नाच्याबाबतीत असं बोलणं बरं दिसत नाही. वडील मंडळी जे कांही ठरवतील, ते मुलींनी मान्य करावं. मी आपल्या कुटुंबाला साजेसा जांवई शोधतो आहे.’’ पण चमेलीचा हट्ट कायम होता. ‘‘बाबा, तुम्ही जो मुलगा पसंत कराल त्याच्याशी मी लग्न करणार नाही. |
|
|