श्रीमतीच्या स्वयंवराला अनेक देशांचे राजे त्रिलोकाचे प्रमुख हजर होते. विष्णूचे रूप घेऊन नारदाने स्वयंवराच्या मांडवात पाऊल टाकताच सर्व खदखदां हंसू लागले. आपले तोंड माकडा-सारखे बदलले असल्याचे कळल्यावर नारदाच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. श्रीमतीने विष्णूचे स्मरण केले त्याबरोबर विष्णु प्रकट झाला. श्रीमतीने विष्णूला वरमाळा घालून त्याला वरले आणि वैकुंठलोकी गेली.
ते पाहून नारद जास्तच चिडला आणि पर्वताबरोबर तो अंबरीषावर संतापला. आपण विचारले तेव्हां श्रीमतीला विष्णूस दिल्याबद्दल अंबरीषाचा सर्वनाश करण्याचे ठरवून त्याला शाप द्यायला तयार झाला. तेव्हां विष्णूचे सुदर्शन चक्र त्याच्या पाठीस लागले. पर्वत व नाद दोघे वैकुंठलोकी धावले. तेथे श्रीमतीसह विष्णूला पाहून नारद जास्तच भडकला व म्हणाला - ‘‘तू सुद्धा श्रीमतीपासून म्हणजे आपल्या बायकोपासून निराळा होऊन विरहव्यथेने विलाप करशील! मला माकडाचे तोंड देऊन तू फसविलेस. तर तुला त्या माकडांचीच मदत घ्यावी लागेल!’’ या शब्दात नारदाने विष्णूला शाप दिला.
नारदाचा तो शाप ऐकून विष्णूने फक्त स्मित केले. श्रीमती लक्ष्मीचे रूप घेऊन आली. जे घडले त्याबद्दल लज्जित नारदाने व पर्वताने विष्णूचे चरण पकडले. नारदाने आपल्या अश्रूंनी विष्णूचे चरण धुतले आणि शाप देऊन पोरखेळ केल्याबद्दल तो दुःख करू लागला. तेव्हां विष्णू नारदाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला - ‘‘तू त्रिकाळवेत्ता आहेस. तुझ्या मुखांतून जे शब्द बाहेर पडले आहेत ते अमोघ आहेत. तुझ्या तोंडून जो शाप बाहेर पडला तो माझ्याच संकल्पाने! मी रामावतार घेईन ते लोककल्याणार्थच होणार!’’
तेव्हांपासून अंबरीष राजाला कोणाकडूनही तसा त्रास होणार नाही, व सुदर्शन चक्र त्याच्या रक्षणार्थ सतत हजर राहील, असे विष्णूने सांगितले.
|