दशरथ राजाने कोणत्याही तर्हेच्या विघ्न-बाधांविना पुत्रकामेष्टि यज्ञ पूर्ण केला. यज्ञकुंडांतून प्रगट होऊन अग्निदेवाने दिलेले पायसदान घेऊन आनंदाने तो राजवाड्यांत गेला. तिथे कौसल्या व कैकयीस ते क्षीर-पात्र दिले आणि खीर अर्धी-अर्धी वांटून ध्यायला सांगितले. त्याला कौसल्या, कैकेयी व सुमित्रा या तीन राण्या होत्या.
कौसल्येने आपल्या खिरींतून थोडी खीर सुमित्रेसाठी वेगळ्या पात्रांत काढून ठेवली. कैकेयीने सुद्धा त्याचप्रमाणे थोडी खीर काढून ठेवली. खीर खाल्ल्यानंतर तिघी राण्या गरोदर राहिल्या. चैत्र शुद्ध नवमीस कौसल्येच्या पोटी श्रीविष्णु नीलमेघासमान सांवळ्या कांतीचे ‘राम’ जन्मले. नंतर कैकेयीस शंख व पद्माच्या अंशाने मौक्तिक नील वर्णाचा भरत जन्मला.
शेष अंशाने तप्तसुवर्णकांतियुक्त लक्ष्मण, व चक्रगदेच्या अंशाने पोवळ्यासारख्या विद्रुमकांतीने युक्त शत्रुघ्न, सुमित्रेच्या उदरी जन्मले. चैत्र शुक्ल नवमी रामनवमी म्हणून कोशल राज्यभर आनंदोत्सवाने साजरी होत असताना तिसरा चैत्र आला. अयोध्या नगरींत चक्रवर्ती सम्राटांच्या मोठ्यामुलाच्या जन्मदिनोत्सवा-निमित्त भव्य प्रमाणावर आनंदसोहळे, दानधर्मादि मंगल कार्ये झाली. नंतर चैत्री पुनवेच्या दिवशी फुललेल्या चांदण्यांत, राजा दशरथ, चार मुलें, तीन राण्या, मंत्री सुमंत, मुलांना खेळवणारा राजघराण्याचा घनिष्ट संबंधी भद्र, दास-दासी, यांच्यासह राजमहालाच्या गच्चीवर आमोद-प्रमोद करीत होता.
|